चेन्नई - सध्या कोरोनाचा काळ सुरू असून अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. हातचा रोजगार गेल्याने अनेक जण अडचणीत सापडले आहेत. कोरोना काळातच चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. तामिळनाडूमधील मदुराई येथे एका चोराने दोन कम्प्युटर, एक टीव्ही आणि 5 हजार रुपयांची रोकड असा सुमारे 65 हजार रुपयांची चोरी करून चक्क मालकाची माफी मागितली आहे.
तामिळनाडूच्या उसिलमपट्टी-मदुरई महामार्गावर एक सुपरमार्केट आहे. दुकान मालक रात्री दुकान बंद करून घरी गेले आणि गुरुवारी सकाळी त्यांनी सवयीप्रमाणे सुपरमार्केट उघडले. यावेळी त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडले असून चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर लागलीच त्यांनी पोलिसांना चोरीबाबत माहिती दिली. मात्र, याच दरम्यान त्यांना चोराने त्यांच्यासाठी लिहिलेली माफीची चिठ्ठी मिळाली.