जागतिक तापमानात वाढ आणि हवामान बदलांमुळे जगभरात सर्वत्र प्राणघातक आपत्ती ओढवत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. यावरुन त्यांचा पर्यावरणाबाबतची बेजबाबदार भूमिका दिसून आली आहे. त्यांनी हवामान बदलांसंदर्भातील सर्व अंदाज धुडकावून लावले आहेत. अमेरिका सुमारे एक ट्रिलियन वृक्षांची लावणी, पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याच्या प्रकल्पात सहभागी होणार आहे, अशीही घोषणा ट्रम्प यांनी केली.
हवामान बदलांसंदर्भातील तरुण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने पर्यावरणीय बदलांविषयी इशारा जारी केला आहे, अशावेळी यासंदर्भात एक वास्तववादी योजना तयार करण्याची जबाबदारी जागतिक नेत्यांवर आहे. आपल्या नेत्यांचे पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे, याबाबत तरुण पिढ्यांकडून मोठ्या प्रमाणावर जाहीर टीका होत आहे. मात्र, विकसित देश या टीकेला जुमानताना दिसत नाहीत. जागतिक तापमानवाढीविरोधात एकत्रितपणे सुरु असलेल्या लढ्यात आपली कोणतीही भूमिका नाही असे अमेरिकेला वाटते, ही बाब अतिशय धक्कादायक आहे.
यापुर्वी अमेरिकेने क्योटो करारापासून फारकत घेतली होती. ओबामा सरकारने पॅरिस करारावर स्वाक्षरी केली होती. मात्र, ट्रम्प यांनी आपले सरकार निवडून आल्यानंतर या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या देशातील नागरिकांनी विरोध करुनसुद्धा ट्रम्प आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. कॅनडा, रशिया आणि ब्राझीलच्या तुलनेत अमेरिकेतील दरडोई वृक्षांचे प्रमाण कमी आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या हरित उपक्रमाला पाठिंबा देताना अमेरिकेने केवळ सारवासारव केली आहे.
अशाश्वत विकास योजना, अविवेकी औद्योगिकीकरण आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून उत्सर्जित होणारे हरितवायू या कारणांमुळे हवामानाचा जलद गतीने ऱ्हास होत आहे. परिणामी, जगभरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे, प्रदुषण, महामारी, अन्नाचा दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीसारख्या घटना घडत आहेत. वैश्विक कार्बन उत्सर्जनात अमेरिका आणि चीनचा 40 टक्के वाटा आहे. भारतातील कार्बन उत्सर्जनाचे (4.5 टक्के) प्रमाण बऱ्यापैकी आहे, आपण स्व-नियमन करण्यात कधीही कमीपणा वाटून घेतलेला नाही. संपुर्ण जगाला अक्षरशः आगीच्या ज्वाळांमध्ये ढकलणाऱ्या देशांना आपल्या क्रियाकलापांची कसलीही चिंता नाही.