हैदराबाद - देशभरात कोरोना विषाणूची प्रकरणे समोर येत असून देशात 1 हजारपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर 27 लोकांचा बळी गेला आहे. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी येत्या 7 एप्रिलपर्यंत तेलंगाणा कोरोनामुक्त होईल, असा दावा केला आहे.
सध्या तेलंगणात कोरोनाचे एकूण 70 रुग्ण आढळले असून 11 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्चही देण्यात येईल. जगातील विविध भागांतून एकूण 25 हजार 937 लोक आले असून त्यांना सरकारी देखरेखीखाली ठेवले गेले. या सर्व लोकांचा विलगणीकरणाचा कालावधी 7 एप्रिलला संपत आहे. या काळात जर नवीन प्रकरण नोंदवले गेले नाही तर 7 एप्रिलनंतर राज्यात कोरोनाचे एकही प्रकरण आढळणार नाही, असे ते म्हणाले.