हैदराबाद- पशुवैद्यकीय महिला डॉक्टर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे शवविच्छेदन पुन्हा करण्याचे आदेश तेलंगाणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. हैदराबादजवळील चट्टनपल्ली येथे पोलीस गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी सुरू आहे.
दिशा प्रकरण: गोळीबारात ठार झालेल्या चार आरोपींचे शवविच्छेदन पुन्हा करा, तेलंगाणा उच्च न्यायालय
हैदराबादमधील पशुवैद्यकीय महिला डॉक्टर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे शवविच्छेदन पुन्हा करण्याचे आदेश तेलंगाणा उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दिल्लीतील एम्स रुग्णालयातील न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून २३ डिसेंबरच्या आत पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश तेलंगाणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच शवविच्छेदन करतानाचे व्हिडिओ शुटींग करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. त्यानतंर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवा, असे आदेश गांधी रुग्णालयाच्या प्रमुखांना दिले आहेत. सर्व पुरावे विशेष तपास पथकाला सोपवण्याचे आदेशही दिले आहेत.
हैदराबादमधील गांधी रुग्णालयातील शवागरामध्ये चारही मृतदेह ठेवण्यात आले आहेत. घटनास्थळावर चौकशीसाठी आरोपींना नेले असता त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता, तसेच पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून देशभरामध्ये खळबळ उडाली होती.