हैदराबाद -शहरातील पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर २४ तासांमध्ये अटक केली आहे. या महिलेवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता.
पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. हे सर्व नारायणपेटा जिल्ह्यात राहणारे, ट्रकचालक आणि क्लिनर आहेत. यामधील दोन जणांची ओळख पटली आहे. मोहम्मद पाशा आणि महबूब अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सर्वांना अटक केली.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ ते ४च्या दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर साधारणपणे एक तास त्यांचा मृतदेह जळत होता. एवढा वेळ मृतदेह जळाल्यामुळे शवविच्छेदन करण्यात अडचण येत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.
बुधवारी रात्री रुग्णालयातून परत जात असताना या महिलेच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे त्या महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांचे बहिणीशी बोलणे झाले. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सायंकाळी बहिणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा : नथुराम गोडसेवरील वक्तव्यावरून लोकसभेमध्ये गदारोळ; प्रज्ञा ठाकूर यांनी मागितली माफी