पाटणा -बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता दोन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. सत्तेत येण्यासाठी विविध पक्षांकडून राज्यभर प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची महनार विधानसभा मतदारसंघातील महीसौरमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. तेजस्वी यादव यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मात्र, यावेळी काही कार्यकर्त्यांमध्येच झटापट झाल्याची घटना घडली.
राजद उमेदवार वीणा सिंह यांच्याकरीता प्रचारसभा घेण्यासाठी तेजस्वी यादव महनारमध्ये पोहचले. तेव्हा कार्यकर्त्यांनी मंचावर जाण्यासाठी गर्दी केली. तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. मात्र, यावेळी तेजस्वी यादव मंचावर उपस्थित नव्हते. तेजस्वी यादव मंचावर येईपर्यंत कार्यकर्त्यांची समजूत काढून प्रकरण शांत करण्यात आले. तसेच तेजस्वी यादव यांना पाहण्यासाठी काही लोकांनी घराच्या छतावर गर्दी केल्याने छत कोसळल्याचीही घटना घडली आहे. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे.