नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शुक्रवारी दिल्लीमध्ये होत असलेल्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यादरम्यान एका अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करण्यात आली होती. या मुलाला साहिबा खानम नावाच्या तरुणीने वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्याचा जीव वाचला.
CAA आंदोलन : तरुणीने वाचवले अल्पवयीन मुलाचे प्राण, लाठीचार्जमध्ये झाला होता जखमी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या तरुणीने सांगितले, की तीही या आंदोलनामध्ये सहभागी होती. अचानक पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्यानंतर इतर लोकांसह एका ऑफिसमध्ये आश्रय घेतला होता. काही वेळानंतर जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा तिने या १६ वर्षीय मुलाला जखमी अवस्थेत पडलेले पाहिले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिने लोकांना मदत मागितली, मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यानंतर तिने एका व्यक्तीच्या मदतीने त्याला रूग्णालयामध्ये दाखल केले.
रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी सांगितले, की त्याच्या डोक्याला बऱ्याच प्रमाणात मार लागला आहे. त्याला वेळेत उपचारासाठी आणले नसते, तर त्याचा जीवही जाण्याचा धोका होता. त्या मुलाचा मोबाईल लाठीचार्जच्या वेळी कुठेतरी पडला होता. त्याला बसलेल्या धक्क्यामुळे आपल्या घराचा पत्तादेखील सांगता येत नव्हता. घरच्या कोणा व्यक्तीचा मोबाईल नंबरही त्याला लक्षात नव्हता. साहिबा रात्री दोन वाजेपर्यंत त्याच्यासोबत रुग्णालयामध्ये थांबली होती. आताही, ती त्याच्या घरच्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.
साहिबा म्हणाली, की पोलिसांनी लाठीचार्जच्या दरम्यान लोकांच्या डोक्यावर वार नाहीत केले पाहिजे. या प्रकारामध्ये पोलीस आंदोलकांना पांगवण्याचा नाही, तर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : अफगाण शरणार्थींना मिळणार भारतीय नागरिकत्व, मोदी सरकारचे मानले आभार