चेन्नई -तामिळनाडूच्या मदुराईमध्ये झालेल्या जल्लीकट्टू स्पर्धेमध्ये जवळपास ७०० बैलांनी सहभाग घेतला आहे. तामिळनाडूमध्ये साजऱ्या होणाऱ्या पोंगल या सणाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित केली जाते.
मद्रास उच्च न्यायालयाने विशेष समितींच्या देखरेखीखाली या स्पर्धांचे आयोजन करण्याची परवानगी दिली होती. या समितींचे प्रमुख हे निवृत्त न्यायाधीश असावेत अशी अटही न्यायालयाने नमूद केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी या स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. तसेच मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २१ वर्षांहून कमी वय असणाऱ्या तरुणांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही, असे आदेश दिले होते.