भोपाळ - मध्य प्रदेश सरकारची बहुमत चाचणी उद्या (शुक्रवार) घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी विधानसभेचे सत्र आयोजित केले जाईल. या सत्रामध्ये हात उंचावून मतदान घेतले जाईल. सभागृहामद्ये पार पडणाऱ्या कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल, तसेच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी पार पाडण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
१६ आमदारांना सक्ती नाही..
काँग्रेसच्या कर्नाटकात असणाऱ्या १६ आमदारांना जर या बहुमत चाचणीमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी. तसेच, या आमदारांना बहुमत चाचणीवेळी उपस्थित राहण्याची सक्ती नसणार आहे, असेही आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, कमलनाथांचे सरकार उद्या बहुमत चाचणी हरेल..
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. सध्याचे सरकार हे केवळ अल्पमतातीलच नाही, तर हे दलालांचे सरकार आहे. या सरकारने मध्य प्रदेशच्या जनतेची फसवणूक केली आहे. हे सरकार नक्कीच उद्याची बहुमत चाचणी हरेल, असे मत भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा :सार्क देशांचे चर्चासत्र : 'मानवतावादी व्यासपीठाचा पाकिस्तानने गैरवापर केला'