नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी सुनावणीचा आज ३२ वा दिवस आहे. या प्रकरणी १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी संपायला हवी, असे सरन्यायाधीश रंजन गोगाई म्हणाले. त्यानंतर पुढील चार आठवड्यात न्यायालयाने निकाल दिला तर तो एक चमत्कार असेल, असे गोगाई म्हणाले.
दिपावली सणाची तारीख लक्षात घेता १८ ऑक्टोबरपर्यंत आयोध्या प्रकरणाची सुनावणी प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी, असे गोगाई म्हणाले. मात्र, सुनावणी या काळात पूर्ण होणे अवघड असल्याचं अधिवक्ता राजीव धवन यांनी सांगितले. १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण झाली नाही, तर निकाल प्रलंबित पडू शकतो, असे गोगाई म्हणाले.
१८ ऑक्टोबरनंतर हिंदू किंवा मुस्लिम पक्षकारांना एक दिवसही वाढून दिला जाणार नाही. त्याआधीच दोन्ही पक्षकारांनी आपआपले म्हणणे मांडावे. सरन्यायाधिश रंजन गोगाई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. न्यायालयाला गोगाई यांचा कार्यकाळ संपण्याआधी या प्रकरणाचा निकाल द्यायचा आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुनावणीस विलंब झाल्यास या प्रकरणी निकाल रखडू शकतो. १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाला निकाल देण्यास काही दिवस लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात हिंदू पक्षकारांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे, आता मुस्लिम पक्षकारांचा युक्तीवाद सुरु आहे, तसेच दोन्ही पक्षकारांनी वेळेत आपले म्हणणे मांडले तर निकाल देण्यासाठी पुढील काळ लागेल असे न्यायालयाने नमुद केले.