नवी दिल्ली- देशामध्ये कोरोनाच्या चाचण्या मोफत करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला निर्देश दिले आहेत. सरकारी वा परवाना दिलेल्या खासगी प्रयोगशाळा या दोन्ही ठिकाणच्या चाचण्या मोफत असाव्यात, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
कोरोना चाचण्या मोफत करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Supreme court corona test
सरकारी वा सरकारी परवाना दिलेले खासगी रुग्णालय या दोन्ही ठिकाणच्या चाचण्या मोफतच असाव्यात असे न्यायालयाने सांगितले आहे.
कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना भरपाई देणे शक्य आहे का? हे तपासून पाहा. हे शक्य झाल्यास नागरिकांना पैसे भरावे लागणार नाहीत, असे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस.रविंद्र भट यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. आतापर्यंत भारतात 1 लाख 21 हजार 271 जणांची कोरोना चाचणी घेतल्याचे आयसीएमआरचे तज्ज्ञ आर गंगाखेडकर यांनी सांगितले आहे. भारतामध्ये 50 पेक्षा जास्त खासगी प्रयोगशाळांना कोरोनाची चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना इतके महागडे दर आकारण्याची परवानगी देऊ नका. सरकारकडून खासगी प्रयोगशाळांना भरपाई देण्यासाठी यंत्रणा तयार करा असा सल्ला न्यायालयाने दिला आहे.