नवी दिल्ली -कलम 370 संपुष्टात आल्यानंतर पहिल्यांदाच गुलाम नबी आझाद यांना काश्मीर दौऱ्यावर जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, या दौऱ्यादरम्यान आझादांना सभा, भाषणांसाठी मज्जाव घालण्यात आला असून परस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा - राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे - उद्धव ठाकरे
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयात काश्मीरला जाण्याची परवानगी मागितली होती. यानुसार न्यायालयाने आझादांना श्रीनगर, बारामुल्ला अनंतनाग आणि जम्मू या ठिकाणी जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या ठिकाणी आझादांना भाषणे वा सभा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. तर आझादांनी काश्मिरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी आशा न्यायालयाने व्यक्त केली आहे. तसेच, गरज भासल्यास मी देखील काश्मीर दौऱ्यावर जाईल, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी व्यक्त केली आहे.
जम्मू आणि काश्मीर दौऱ्यासाठी परवानगी दिल्याबद्दल, मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. दौऱ्यानंतर मी माझा अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करेल. मला आनंद आहे की, मुख्य न्यायाधिशांनी काश्मीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. तसेच मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वत: काश्मीरला भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी करावी, अशी प्रतिक्रिया आझादांनी परवानगी मिळाल्यानंतर ट्वीट करत व्यक्त केली आहे.