लखनऊ -उत्तर प्रदेशच्या राज्यसभेच्या जागेवर बुधवारी भाजप उमेदवार सुधांशु त्रिवेदी यांची बिनविरोध निवड झाली. त्रिवेदी बऱ्याच काळापासून भाजपसोबत आहेत. आता ते त्यांची संसदेतील पहिली 'इनिंग' सुरू करणार आहेत.
बुधवारी विधानसभा विशेष सचिव बी. बी. दुबे यांनी ही माहिती दिली. बुधवारी नामांकन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख होती. दुबे यांनी त्रिवेदी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे सांगून प्रमाणपत्र ते मिळवण्यासाठी स्वतः हजर राहिल्याची माहिती दिली.
योगी आदित्यनाथ सरकारमधील वरिष्ठ मंत्री ब्रजेश पाठक, आशुतोष टंडन, मोहसीन रझा आणि उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष जे. पी. एस. राठोड आदी त्रिवेदी यांच्यासह उपस्थित होते. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपचे मोठे बहुमत असल्याने त्रिवेदी यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात होती. त्यांनी ४ ऑक्टोबरला नामांकन केले होते. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते त्रिवेदी यांची भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवड झाली आहे.
जेटलींची या जागेवर 2018 मध्ये निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ 2024 पर्यंत होता. त्यांचे यंदा ऑगस्टमध्ये निधन झाले.