पाटना -कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला आहे. ही बाब लक्षात घेऊन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सीबीएसईच्या सर्व शाळांना ऑनलाईन शिकवणी वर्ग घेण्याच्या सुचना केल्या आहेत.
पटनातील ६० हजार विद्यार्थी घेत आहेत ऑनलाईन धडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सांगितल्यानंतर बिहारमधील सर्व मान्यताप्राप्त सीबीएसई शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले जाते तर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गृहपाठाची तपासणी केली जाते.
या व्यतिरिक्त बिहारची राजधानी पटनामधील अनेक खासगी शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्यास सुरुवात केली आहे. शाळेच्या वेळापत्रकानुसारच वर्ग घेतले जातात. शाळेची वेळ होताच विद्यार्थी आणि शिक्षक घरातून ऑनलाईन येतात. बिहार विद्यापीठाच्या आर्य महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या शिक्षिका सुमन सिन्हा लॉकडाऊनमुळे पटनामध्ये अ़डकल्या. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.
ऑनलाईन शिकवणीच्या माध्यमातून राज्यातील ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक शिक्षक एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना शिकवू शकत आहे. जापर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे.