डेहराडून - कारगिल विजय दिवसाला येत्या 26 जुलैला 20 वर्ष पुर्ण होणार आहेत. हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस आहे. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. कारगिलच्या कथा देशातील नागरिकांना प्रेरणा देतात. गोरखा रेजिमेंटमधील जवान कैलास क्षैत्री यांची ही कथा प्रेरणा देणारी आहे.
कैलास क्षेत्री हे डेहराडूनमधील सेलाकुई येथील रहिवासी आहेत.1998 मध्ये त्यांची जम्मु काश्मीरमधील दराज भागात नेमणूक झाली होती. यामध्ये त्यांना शस्त्रांचे वितरण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आपली जबाबदारी पार पाडताना त्यांना अनेकवेळा मृत्यूला सामोरे जावे लागले मात्र देशाची सेवा ही त्यांची प्राथमिकता होती.
कैलाश यांनी माहिती दिली की, जेव्हा भारतीय सैन्याला शस्त्रांची गरज होती. तेव्हा त्यांना पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या टेकडीतून जावे लागले होते. पाकिस्तान सतत डोंगरावरुन गोळीबार करीत होता. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. पुढे जाणे खूप कठीण होते, परंतु भारतीय लष्कराला शस्त्र पोहचवणे देखील महत्वाचे होते. अशा परिस्थितीत रस्ता पार करताना शत्रूला त्याची खबर लागू नये म्हणून त्यांनी वाहनाचे दिवे बंद करुन आपले लक्ष्य गाठले.
कारगिल युद्धाच्या वेळी वातावरणा संवेदनशील होते. सैन्यातील प्रत्येक तरुण देशासाठी मरण्यास तयार होता. भारतीय सेनेचा उत्साह कोणालाही नष्ट करण्यास सक्षम होता.जेव्हा लढा संपला तेव्हा प्रत्येकजण भावनिक होता. युध्दात गमवलेल्या साथिदारांचे दु:ख ही होते, असे त्यांनी सांगितले. सरकारने हुतात्मा झालेल्या जवानांच्या मानवंदनेवेळी केलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणे आवश्यक आहे. जेणेकरून सैन्यात भरती होण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळेल, अशी विनंती त्यांनी शासनाला केली आहे.