नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन असताना परदेशात अडकलेल्या 30 हजार भारतीयांना माघारी आणण्यासाठी 200 चार्टर फ्लाईटची सेवा दिल्याची माहिती स्पाईस जेटने दिली. संयुक्त अरब अमिरातमधून 20 हजार भारतीयांना 111 फ्लाईटमधून माघारी आणल्याचे कंपनीने सांगितले.
सौदी अरेबिया, कतार, लेबनॉन, श्रीलंकामध्ये अडकलेल्या नागरिकांना माघारी आणण्यासाठी 50 फ्लाईट चालवल्या, असे स्पाईस जेटने पत्रक जारी करत माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सेवा बंद आहे. तर 25 मे पासून दोन महिन्यांच्या खंडानंतर देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली. कोरोनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे विमान कंपन्यांनाही मोठा तोटा झाला.