हैदराबाद - तेलंगाणामध्ये अडकलेल्या हरियाणाच्या तब्बल बाराशे कामगारांना आपल्या राज्यामध्ये परत जाता यावे यासाठी लिंगमपल्लीवरून एक विशेष रेल्वे हरियाणाच्या हातियाकडे रवाना झाली आहे. तेलंगाणा सरकारने यावेळी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत या कामगारांना घराकडे रवाना केले. गाडीमध्ये बसवण्यापूर्वी या सर्व कामगारांचे थर्मल स्कॅनिंगही करण्यात आले, तसेच रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कित्येक विस्थापित कामगार परराज्यांमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता कित्येक राज्यांमधील कामगारांना आपापल्या राज्यांमध्ये परत पाठवण्यासाठी विशेष वाहनांची सोय करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन राज्यांच्या राज्य सरकारांनी विनंती केल्यानंतर मंत्रालय आणखीही अशा गाड्यांचे आयोजन करणार आहे.