हैदराबाद -अनेक वर्ष आपल्या आवाजाने दक्षिणात्य सिनेमात जादू चालवल्यानंतर पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांनी हिंदी चित्रपटांमध्येही निर्विवाद यश संपादन केले. या महान गायकाने आपल्या प्रतिभेच्याबळावर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
पद्मभूषण पुरस्कार विजेत्या एसपींनी 1966 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'श्री श्री मर्यादा रमन्ना' या तेलुगू चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम आपला आवाज दिला होता. त्यानंतर त्यांनी कन्नड आणि तमिळ गाणीही गायली.
अल्पावधीतच संगीताच्या दुनियेत एसपी प्रसिद्ध झाले. मात्र, त्यांनाही अनेक चढउतार पहावे लागले. सुरुवातीला शास्त्रीय संगीतात ज्ञान कमी असल्याचे कारण देत त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. मात्र, एसपींनी कोणत्याही टीकेला न जुमानता कष्ट केले. त्यांनी प्रसिद्ध तेलुगू चित्रपट 'शंकराभरणम' मध्ये आपला आवाज दिला. या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी लोकांची मने जिंकली. बालासुब्रमण्यम यांनी पटकावलेल्या सहा राष्ट्रीय पुरस्कारांमधील पहिला पुरस्कार हा तेलुगू गाण्यासाठीच मिळालेला आहे.
बालासुब्रमण्यम यांनी लोकप्रिय नंदमुरी तारक रामा राव यांच्यासह अनेक दिग्गज दक्षिणात्य अभिनेत्यांची गाणी गायली. कमल हसनच्या 'एक दूजे के लिए' चित्रपटातील गाण्यांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांना तमीळ आणि कन्नड गाण्यांसाठी देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.