नवी दिल्ली -काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. सोनिया गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक आज दुपारी ३ वाजता घेणार आहेत. या बैठकीला आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे प्रमुख अनुपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. समाजवादी पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
लॉकडाऊनमध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशला येणाऱ्या कामगारांसाठी बस पाठवल्या होत्या, ही बाब बसपा अध्यक्ष मायावती यांना रुचली नाही. तर मायावती यांनी पंजाबमध्ये असलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी बसची व्यवस्था करावी, असे काँग्रेसने सांगितले होते. मात्र, मायावतींने ते मान्य केले नाही. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे. तर आप आणि काँग्रेसचे दिल्लीत संबध ताणलेले आहेत.