नवी दिल्ली - देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सलग दहाव्या दिवशी वाढ झाली आहे. मंगळवारी इंधन कंपन्यांनी तेलाच्या दरामध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये इंधन दरवाढ करणे, म्हणजे असंवेदशीलता असून, यावर केंद्र सरकारने विचार करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये केली आहे.
इंधन दरवाढ निर्णयावर पुनर्विचार व्हावा; सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र - पेट्रोल दरवाढ
देश सध्या करोनाच्या संकटातून जात असताना इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या समस्यांमध्ये भर घातली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असून, यासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
इंधन दर आणि उत्पादन शुल्कामध्ये वाढ करून अडीच लाख कोटी रुपये मिळवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप सोनिया गांधींनी पत्रामध्ये केला आहे. देश सध्या करोनाच्या संकटातून जात असताना इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या समस्यांमध्ये भर घातली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
माझी तुम्हाला विनंती आहे की, ही इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा थेट देशातील नागरिकांना दिला जावा. तुम्हाला लोकांनी आत्मनिर्भर व्हावे, असे वाटत असेल, तर त्यांच्या पुढे जाण्याच्या मार्गात आर्थिक अडथळे आणू नका. मी पुन्हा एकदा सांगते की, जे लोक या कठीण प्रसंगातून जात आहेत, थेट त्यांच्या हातात पैसे द्यावे, असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.