बेळगाव - पब्जी खेळताना मध्येच अडवल्यामुळे चिडून एका २१ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या बेळगाव मध्ये ही घटना घडली आहे. रघुवीर कुंभार असे या तरुणाचे नाव आहे. तर, शंकराप्पा कुंभार असे त्याच्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. ते एक निवृत्त पोलीस अधिकारी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पब्जी खेळण्यावरून सतत या दोघांमध्ये वाद होत होते. रघुवीरचे वडील कायम त्याला पब्जी खेळण्याच्या सवयीवरून ओरडत. रविवारी रात्रीदेखील दोघांमध्ये असेच भांडण झाले. त्यानंतर, रघुवीरने त्याच्या आईला दुसऱ्या खोलीमध्ये बंद करत, वडिलांची हत्या केली.
निर्घृणपणे केली हत्या..
रघुवीरने आपल्या पित्याची हत्या करत, त्यांचे शिर धडावेगळे केले, तसेच त्यांचा एक पायही कापून बाजूला फेकला. आईने मध्ये पडू नये, म्हणून त्याने आईला दुसऱया खोलीमध्ये बंद करुन ठेवले होते. आपल्याला शांततेत पब्जी खेळता यावी म्हणून खून केल्याचे त्याने सांगितले.