जयपूर -काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यापासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार संकटात सापडले आहे. येत्या 14 ऑगस्टपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. आमदारांच्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी गेहलोत स्वत:ची स्थिती मजबूत करण्यात गुंतले आहेत. रविवारी त्यांनी जैसलमेर येथे ठेवलेल्या आमदारांची भेट घेतली आणि या राजकीय लढ्यात पक्षाच्या आमदारांना विधानसभेत आपली एकजूट दाखवण्यास सांगितले.
'आपण सर्व जण लोकशाही योद्धे असून हे राजकीय युद्ध जिंकणार आहोत. साडेतीन वर्षानंतर (विधानसभा) निवडणूकही पुन्हा आपणच जिंकू. तुम्ही आजपर्यंत जे ऐक्य दाखविले तेच ऐक्य तुम्हाला सभागृहात दाखवावे लागेल, असे गेहलोत आमदारांना संबोधीत करताना म्हणाले. काँग्रेसचे नेते अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा हेही या बैठकीस उपस्थित होते.