नवी दिल्ली - काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे काल (शनिवारी) हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पुत्र संदीप दीक्षित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आईची आठवण येत राहील, हे नैसर्गिक आहे. आईला गमावल्याच्या यातना विसरता येत नाहीत. जेव्हाही लोक दिल्लीच्या विकासाबद्दल बोलतील तेव्हा तिची आठवण काढली जाईल, असे भावनिक उद्गार संदीप दीक्षित यांनी काढले.
दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीमध्ये दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी २.३० वाजता निगमबोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी दुपारी १२.१५ वाजता त्यांचे पार्थिव काँग्रेस भवनात ठेवण्यात येणार आहे. तेथे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली वाहतील.
शीला दीक्षित यांनी १५ वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. १९९८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.