मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आरोपी पीटर मुखर्जीचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यांवर पीटरचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पीटरची तब्येत ठीक नसल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले.
शीना बोरा हत्या कांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे दोघेही मुंबईतील कारागृहात गेल्या 4 वर्षांपासून आहेत. मात्र, आता पीटर मुखर्जी यास उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शीना बोराच्या हत्येवेळी पीटर भारतात नव्हता, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच पीटरचे आजारपण तुरुंगात बळावण्याची शक्यता असल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर पीटर मुखर्जी यास जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा -इंटरनेट वापराबाबत काश्मीरचे घटनात्मक अधिकार!
दरम्यान, सीबीआयने पीटरला जामीन देण्याचा सातत्याने विरोध केला आहे. पीटरला जामीन दिल्यानंतर उच्च न्यायालयाने आपला हा आदेश सहा आठवड्यांसाठी प्रलंबित ठेवला आहे. जेणेकरून सीबीआय या जामिनाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकेल. त्यामुळे जामीन जरी मिळाला असला तरी पीटर मुखर्जीला येत्या 6 आठवड्यांपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.
काय आहे प्रकरण?
पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी साथीदारांसह एप्रिल २०१२ मध्ये मुलगी शीना बोराची (वय २४) अत्यंत क्रुरपणे हत्या केली होती. शीनाचा मृतदेहाची रायगड येथील जंगलात विल्हेवाट लावण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्ना, चालक रायला यांनाही अटक केली होती. शीनाच्या हत्येवेळी पीटर मुखर्जी हा परदेशात होता. मात्र, तेथूनही तो इंद्राणीच्या संपर्कात होता. पीटर आणि आणि इंद्राणी यांच्या मध्ये जवळपास २० ते २५ संभाषण झाले होते. दरम्यान पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी या दोघात घटस्फोट झाला असून या दोघांनी सहमतीने घटस्फोट घेत संपत्ती वाटून घेतली आहे.
हेही वाचा -नो टू सिंगल यूज प्लास्टिक: कोलकात्यातील बांगुर एवेन्यू झालंय प्लास्टिक मुक्त