भाजपला 'खामोश' म्हणत 'शॉटगन' यांचा आज काँग्रेस प्रवेश - BJP
पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहंवर सिन्हा यांनी अनेकदा टीका केली होती. यावरुन सिन्हा दुसऱ्या पक्षात सामील होतील, असे वाटत होते.
नवी दिल्ली -प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस अभियान समितीचे अध्यक्ष अखिलेख प्रसाद यांनी सिन्हा यांच्या काँग्रेस प्रवेशाविषयी माहिती दिली आहे.
भाजपने यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना पटणा साहिब येथून लोकसभेचे तिकीट दिले नाही. त्याजागी रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. आज नवी दिल्ली येथे सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना पटणा साहिब येथून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी माहितीही अखिलेख प्रसाद यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा भाजप नेतृत्वावर सातत्याने टीका करत होते. यावरुन हे स्पष्ट झाले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीत सिन्हा यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही. नुकताच राहुल गांधी यांनी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेची स्तुती करत हा 'मास्टरस्ट्रोक' असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हा भाजपच्या स्टार प्रचारकांमधील एक राहिलेले आहेत. मात्र, आपल्या पक्षात आपल्याला महत्त्व दिले जात नसल्याचे सिन्हा यांनी बोलून दाखविले होते. तसेच पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहंवर सिन्हा यांनी अनेकदा टीका केली होती. यावरुन सिन्हा दुसऱ्या पक्षात सामील होतील, असे वाटत होते.