नवी दिल्ली - सीएएला विरोध करणाऱ्या शाहीन बाग येथील आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीने २०१९ साली 'आम आदमी पक्षा'त प्रवेश केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यासंबधीची काही छायाचित्रे आरोपीच्या मोबाईमधून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला आढळून आली आहेत.
या छायाचित्रांमध्ये आरोपी कपिल आप पक्षाचे नेते अतिशी आणि संजय सिंह यांच्या सोबत दिसून येत आहे. एक वर्षापूर्वी म्हणजेच २०१९ साली कपिल गुर्जरने आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळचे ही छायाचित्रे असून त्याचे वडिल आणि इतरांनी आप पक्षात प्रवेश केला होता. यासंबधी तपासासाठी आम्ही आरोपीची दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त राजेश देव यांनी माहिती दिली. यावर आम आमदी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप घाणेरडे राजकारण करत आहे. अमित शाह केंद्रिय गृहमंत्री आहेत. दिल्ली निवडणुकीआधी हे कारस्थान रचले जात आहे. निवडणुकीला तीन चार दिवस राहीले आहेत, त्यामुळे भाजप जेवढे घाणेरडे राजकारण करता येईल, तेवढे करत आहे, असे सिंह म्हणाले.