नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शाह यांनी माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया रोखण्यासाठी आणखी ठोस पावले उचलण्याचे निर्देश राज्यांना दिले. डाव्या कट्टरतावादाचा (लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम) प्रसार करणाऱ्या कारवाया कमी झाल्या आहेत. मात्र, हा कट्टरतावाद पूर्णपणे संपवण्यासाठी राज्यांनी शरणागती पत्करणाऱ्या लोकांसाठीची धोरणांमध्ये काळानुरूप योग्य ते बदल करावेत, असे शाह यांनी म्हटले आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'नव भारता'च्या स्वप्नामध्ये डाव्या कट्टरतावादाला स्थान नाही,' असे शाह म्हणाले. डाव्या कट्टरतावादावर उपाययोजना करण्यासाठी झालेल्या बैठकीत शाह यांनी डावा कट्टरतावाद पसरलेल्या राज्यांमध्ये सर्वंकष विकास करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. संरक्षक दलांनीही अधिक प्रभावीपणे याविरोधात धोरण राबवावे. अनेक सर्वसामान्य लोक माओवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. हे निष्पाप नागरिक यातून सुटू शकतील, असे अशा योजना राबवाव्यात, असे शाह म्हणाले.