नवी दिल्ली - राज्याच्या राजकारणात प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित आले असताना वेगाने घडामोडी घडत आहे. शिवसेनेच्या चार खासदारांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. नुकतेच भाजपने शिवसेना ही एनडीएमध्ये नसल्याचे घोषणा केली आहे. तर सत्तेमध्ये तांत्रिकदृष्ट्या असूनही शिवसेनेचे खासदार संसदेमध्ये सध्या विरोधी पक्षाच्या बाकावर बसत आहेत.
हेही वाचा-संविधान दिनानिमित्त दोन्ही सभागृह एकत्र येणार; कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार
महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर शिवसेना व भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून काही दिवस रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर शिवेसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अचानकपणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत भाजपला पाठिंबा दिला आहे. अशा वेगवान राजकीय घडामोडी सुरू असताना शिवसेनेच्या खासदारांनी सोनिया गांधींची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचे दिल्लीतही आणखी काय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, संविधान दिनानिमित्त संसदेमध्ये आयोजित कार्यक्रमावर शिवसेनेसह विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.