नवी दिल्ली - संरक्षण दलांना एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी आता हवाई मार्गाचा वापर करण्यात येईल. हा निर्णय केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज घेतला आहे. पुलवामा घटनेआधी सीआरपीएफच्या जवानांना विमानाने जाण्याची परवानगी मागण्यात आली होती. पण, ती नाकारली गेली होती.
संरक्षण दलांना दिल्ली ते श्रीनगर, श्रीनगर ते दिल्ली, जम्मू ते श्रीनगर आणि श्रीनगर ते जम्मू असा प्रवास करावा लागतो. हा प्रवास इथून पुढे विमानाने करण्यात येईल. तसेच, जवानांना सुट्टीवर जम्मूहून घरी आणि घराहून जम्मूला परतायचे असेल तरी विमानानेच नेले जाईल.
पुलवामा हल्ल्यानंतर 'ती' चूक सुधारली, गृहमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय - BJP
पुलवामा घटनेच्या आधी सीआरपीएफ जवानांना हवाई मार्गाने नेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. पण, ती नाकारण्यात आली होती. पण, आता जवानांना हवाई मार्गानेच नेण्यात येईल, असा निर्णय गृहमंत्र्यांनी घेतला आहे.
राजनाथ सिंह
१४ फेब्रुवारीला २५०० जवान ७८ बसमधून जम्मूहून श्रीनगरला जात होते. त्यावेळी त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात ४५ जवानांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते. यानंतर केंद्र सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यानंतर आज केंद्र सरकारचा हा निर्णय समोर आला आहे.