दंतेवाडा (छत्तीसगड)- जिल्ह्याच्या गीदम-बारसूर मार्गावर एक भरधाव स्कॉर्पिओ झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना उपचारार्थ गीदम स्वास्थ केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हौरनार गावातील ११ लोक स्कॉर्पिओ वाहनाने सहलीसाठी सातधार येथे गेले होते. दरम्यान परत येताना ही स्कॉर्पिओ बारसूर मार्गावरील राम मंदिराजवळ एका झाडाला धडकली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झालेत. स्कॉर्पिओ भरधाव वेगात असल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. स्कॉर्पिओतील लोकांना बाहेर काढण्यासाठी परिसरातील लोकांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले होते.