मुंबई -ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर आपले मत व्यक्त केले आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांना लोकसभा पराभवानंतर त्वरित पुनर्वसन हवे होते, यामुळे त्यांनी हा निर्णय़ घेतला असल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. यासोबतच, मध्यप्रदेशमधील काँग्रेस नेतृत्व सक्षम आहे. तसेच, मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा महाराष्ट्रातील राजकारणावर काहीही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातही तशी परिस्थिती होऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळांमध्ये होत होत्या. मात्र महाराष्ट्रात तशी परिस्थिती होण्याची शक्यता नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.