नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असेलली समझौता एक्सप्रेस पाकिस्ताने अचानक रद्द केली आहे. ही रेल्वे सेवा रद्द केल्यामुळे ११७ प्रवासी अटारी रेल्वे स्थानकावर अडकून पडले होते. पाकिस्तानी ड्रायव्हर आणि गाईड प्रवासातच रेल्वे सोडून माघारी निघून गेले होते. त्यानंतर भारतीय कर्मचाऱ्यांनी अटारी रेल्वे स्थानकावर जाऊन समझोता एक्सप्रेस दिल्लीमध्ये आणली. आज सकाळी ८ वाजता एक्सप्रेस दिल्लीमध्ये पोहचली. साडेचार तास उशिराने रेल्वे भारतात दाखल झाली.
७६ भारतीय आणि ४१ पाकिस्तानी प्रवाशांना घेऊन 'समझोता एक्सप्रेस' पोहचली भारतात - समझोता एक्सप्रेस
भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस सेवा रद्द केली होती. आता भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे भारतात आणली.
या रेल्वेमध्ये ७६ भारतीय आणि ४१ पाकिस्तानी प्रवासी होते. भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताशी सर्व स्तरावर संबध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान सुरु असलेली समझोता एक्सप्रेस सेवा पाकिस्तानने अचानक रद्द केली. पाकिस्तानमधील वाघा सीमेपलीकडील स्थानकावर रेल्वे सोडून पाकिस्तानी ड्रायव्हर आणि गाईड माघारी गेले. पाकिस्तानने रेल्वे भारतात नेण्यास नकार दिला. त्यानंतर भारतीय कर्मचाऱ्यांनी रेल्वे इंजिन नेऊन समझोता एक्सप्रेस अटारी स्थानकापर्यंत आणली. त्यानंतर रेल्वे रात्री दीडच्या सुमारास अटारी स्थानकावरुन दिल्लीच्या दिशेने निघाली होती. आज (शुक्रवारी) सकाळी रेल्वे दिल्ली स्थानकावर पोहचली.
समझोता रेल्वे सेवा रद्द झाली नसल्याचे भारतीय रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने कर्मचारी पाठवण्यास नकार दिला आहे. काश्मीर मुद्यावरुन पाकिस्तान एकटा पडला असल्याने भारताच्या निर्णयाविरोधात जगभरात मदत मागत आहे. मात्र, कोणत्याही देशाने अद्यापपर्यंत पाकिस्तानच्या बाजूने वक्तव्य केले नाही.