नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीवर अखेर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी आपापसात जागा वाटून घेतल्या. यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी एका जागेची मागणी केली आहे.
युतीच्या जागा वाटपावेळी विचारले नाही; रामदास आठवलेंकडून एका जागेची मागणी - loksabha
भाजप आणि शिवसेनेने जागांचे वाटप केले आहे. २३ - २५ चे समिकरण त्यांनी लोकसभेसाठी बनविले आहे. यात आरपीआयसारख्या छोट्या पक्षांना स्थान दिले नाही.
आठवले म्हणाले, की युतीच्या जागावाटपात आमचा विचार घेण्यात आला नाही. मी एका जागेची मागणी केली होती. पण, दोन्ही पक्षांनी आपापसात जागा वाटून घेतल्या. यामुळे राज्यातील दलित समाजात नाराजी पसरण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी अनुक्रमे २५-२३ असे जागावाटप जाहीर केले. यात रामदास आठवलेंच्या पक्षाचा कोणताही विचार केला गेला नाही. आठवलेंनी याच मुद्यावर जोर देताना म्हटले, की आम्हाला एक जागा मिळाली नाही तर भाजप-शिवसेनेला दलित मते मिळण्यास अडथळा येईल.
रामदास आठवले हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडणून आले आहेत. ते केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील दलित समुदायातील विशिष्ट वर्गात आठवलेंचा प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे युतीचे नेते आठवलेंच्या मागणीला कशाप्रकारे हाताळतात, यावर युतीच्या मतांची बेरीज अवलंबून आहे.