नवी दिल्ली -कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम केअर (PM-CARES) फंडाची निर्मिती करण्यात आली आहे. या फंडात २७ मार्च ते ३१ मार्च या पाच दिवसांत तब्बल ३ हजार ७६ कोटींचा निधी जमा झाल्याचे लेखा अहवालात स्पष्ट झाले आहे. या देणगीदारांची नावे सरकारने जाहीर करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबर यांनी केली आहे.
या पाच दिवसांतील एकूण निधीपैकी ३ हजार ७५.८५ कोटी निधी देशी देणगीदारांकडून मिळाला आहे. तर ३९.६७ लाख परदेशातून देणगी आली आहे. या फंडाच्या निर्मितीवेळी त्यात २ लाख २५ हजार रुपये होते. तर यावर ३५ लाखांचे व्याज मिळाल्याचे लेखा अहवालातून समोर आले आहे. पीएम केअर फंडाच्या वेबसाईटवर हा अहवाल अपलोड करण्यात आला आहे. मात्र, सर्व देशी आणि विदेशी देणगीदारांची नावे आणि संबंधीत माहिती सरकारने उघड केली नाही.
माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी देणगीदारांची नावे उघड न केल्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. फंडात देणगी देणाऱ्या दानशुर लोकांची नावे सराकारने का उघड केली नाहीत. इतर सर्व स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि ट्रस्टला ठराविक रकमेपेक्षा जास्त निधी जमा केल्यास देणगीदारांची नावे का उघड करावी लागतात. पीएम केअर फंडाला या नियमातून सुट का देण्यात आली आहे, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
'देणगी देणारे माहित आहे. देणगी देणाऱ्यांचे विश्वस्तही माहिती आहेत. तर विश्वस्त आणि देणगीदारांचे नावे उघड का केली जात नाहीत', असा सवाल चिदंबरम यांनी सरकारला ट्विट करून विचारला आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जमा करण्यात आलेला पीएम केअर फंडाची रक्कम राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीत जमा करण्याची गरज नाही. पीएम केअर फंडांतर्गत जमा करण्यात आलेली रक्कम इतर चॅरिटेबल ट्रस्टपेक्षा वेगळी आहे. आपत्ती निवारण निधीमध्ये पीएम केअर फंडाचा पैसा हस्तांतरीत करण्याची गरज जर सरकारला वाटत असेल, तर ते तसे करू शकतात, असे न्यायालयाने म्हटले होते.