नवी दिल्ली -कोरोना संकटातही देशातील आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी आज(बुधवार) झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अवकाश क्षेत्र, शेतकरी सहाय्य, ग्रामीण विकास आणि लहान उद्योगधंदे यासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
सरकारच्या निर्णयांचा कोट्यवधी लोकांना फायदा होणार असल्याचे म्हणत मोदींनी सर्व निर्णयांची माहिती ट्विटरद्वारे दिली. सुधारणांचा आलेख पुढेच जात आहे, असे मोदी म्हणाले. अवकाश संशोधनातील सर्व कामांसाठी खासगी क्षेत्राला परवानगी देण्यात आली आहे. अवकाशात संशोधनाचे कामही आता खासगी कंपन्यांना करता येणार आहेत. भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगत आणि आत्मनिर्भर करण्यासाठी अवकाश क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे खासगी क्षेत्राला चालना मिळले, असे मोदी म्हणाले.