कोलकाता (पश्चिम बंगाल) - परराज्यात अडकलेल्या बंगाली नागरिकांना आणण्यासाठी ममता बॅनर्जी यांचे सरकार काहीच करत नसल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार अधिररंजन चौधरी यांनी केला आहे. जर तुमच्याने होत नसेल तर मला सांगा मी त्यांना आणण्याची सोय करतो, असेही ते म्हणाले.
पश्चिम बंगालमधील लाखो नागरिक देशातील विविध राज्यात उदरनिर्वाहासाठी गेलेले आहेत. टाळेबंदीमुळे त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होत आहे. त्यांना आपल्या घरी परतायचे आहे. पण, राज्य शासनाकडून त्यांना आणण्याची काहीच हालचाल केली जात नाही.
केंद्र शासनाने विविध राज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेची परवानगी दिली आहे. त्यासाठी संबंधित शासनाला परवानगी मिळवावी लागते. देशातील अनेक राज्यातील सरकारने आपल्या राज्यातील कामगारांना परत आणण्यासाठी पाऊले उचचली. काही राज्यातील कामगारही त्यांच्या राज्यात पोहोचले. पण, पश्चिम बंगालमधील कामगारांना आणण्यासाठी येथील नोडल अधिकारीही काहीच हालचाल करत नसल्याचे दिसते, असेही खासदार चौधरी म्हणाले.
ते म्हणाले, जर तुमच्याने होत नसेल तर मला सांगा. मी आपल्या राज्यातील कामगारांना परत आणण्याचा प्रयत्न करतो, असे आवाहनही त्यांनी बॅनर्जी सरकारला केले.
हेही वाचा -लोकपाल सदस्य अजय कुमार त्रिपाठी यांचे निधन, 'यामुळे' झाला मृत्यू