महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल मान्यवरांकडून शोक व्यक्त - राहुल गांधी न्यूज

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची माहिती त्यांचे सुपुत्र अभिजित मुखर्जी यांनी स्वत:च्या ट्विटरवरुन दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाबद्दल देशातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

pranab mukharjee demise
प्रणव मुखर्जी

By

Published : Aug 31, 2020, 6:38 PM IST

Updated : Aug 31, 2020, 10:13 PM IST

नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे लष्करी रुग्णालयात निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. आज सकाळी रुग्णालयाने फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. पण अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते ८४ वर्षांचे होते. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. यानंतर राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासंह राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र, देशवासिय यांच्याप्रती शोक व्यक्त करतो, असेही राष्ट्रपतींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सार्वजनिक जीवनात मोठे स्थान प्राप्त करणारे प्रणव मुखर्जी यांनी एका संतासारखी भारतमातेची सेवा केली. देशाच्या या सुपुत्राच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकाकूल आहे, असेही राष्ट्रपतींनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनाला भेट देणे सर्वसामान्य भारतीय नागरिकांना सुकर झाले. राष्ट्रपती भवनाला मुखर्जी यांनी शिक्षणाचे,नाविन्यता, संस्कृती,विज्ञान, साहित्याचे केंद्र बनवले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. दूरदृष्टी असणारा नेता देशाने गमावला आहे. एका गावातून राजकारणात येऊन मुखर्जी यांनी त्यांची क्षमता, कठोर परिश्रम,समपर्ण,शिस्त याद्वारे देशाच्या सर्वोच्च पदाचा मान वाढवला, अशा शब्दात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान

प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे स्वतंत्र भारतातील एक मोठा नेता आपण गमावला आहे. केंद्र सरकारमध्ये असताना आम्ही एकत्र काम केले. त्यांच्याकडे असणारे चतुरस्त्र ज्ञान, सार्वजनिक जीवनातील अनुभव यासाठी मी त्यांच्यावर अवलंबून असत, अशा भावना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्यक्त केल्या आहेत.

सोनिया गांधी, अंतरिम अध्यक्षा, काँग्रेस

प्रणव मुखर्जी हे देशातील नामवंत नेते होते. त्यांनी केंद्र सरकार आणि काँग्रेस पार्टीमध्ये 5 दशकांहून अधिक काळ कार्य केले. त्यांच्या निधनामुळे आपण सर्व त्यांचे अनेक विषयातील ज्ञान, अनुभव, योग्य सल्ला या सर्व गोष्टींची आपल्याला कमतरता जाणवेल. राजकारणात काम करत असतानाच्या त्यांच्यासोबतच्या अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत, असे काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी, काँग्रेस नेते

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची बातमी आज आली. संपूर्ण देशासह मी देखील त्यांना आदरांजली वाहतो, अशा शब्दात राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. मुखर्जी यांच्या कुटुंबाप्रती राहुल गांधी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

भारतरत्न प्रणव मुखर्जी हे एक आदरणीय सहकारी, उत्कृष्ट संसदपडू आणि प्रिय मित्र होते. त्यांच्यावर सोपवलेल्या कोणत्याही जबाबदाऱ्यांपासून ते कधीही मागे हटले नाहीत आणि त्यांनी भारताच्या उन्नतीसाठी निर्धाराने कार्य केले. भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर मुलगा गमावला आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाचे आणि त्यांनी बंगालच्या जनतेसाठी केलेले कार्य आणि त्यागाला अभिवादन करते, असे ट्वीट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. त्यांच्या निधनाने झालेले नुकसान भरुन निघणार नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.

महिंद राजपक्षे, पंतप्रधान, श्रीलंका

प्रणव मुखर्जी बुद्धिवंत राज्यकारणी होते. त्यांच्यावर सर्व लोकांनी प्रेम केले. मुखर्जी यांनी केलेल्या देशसेवेची तुलना होऊ शकत नाही, अशा शब्दात श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद राजपक्षे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे. गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेस धार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचा विचार करून त्यांनी पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. प्रणवबाबू आपल्यातून निघून गेले. त्यांचा प्रभाव देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ राहील. महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मी त्यांना आदरांजली वाहत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते

माजी राष्ट्रपती आणि माझे मार्गदर्शक प्रणवदा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खदायक आहे. मला २० वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. इंदिरा कॉंग्रेस आणि आजच्या कॉंग्रेसला जोडणाऱ्या मोजक्याच नेत्यांपैकी महत्वाचा दुवा आज गमावला. ओम शांती!, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रणव मुखर्जी यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणवदा मुखर्जी हे काँग्रेसचेच नव्हे तर देशातील ज्येष्ठ मार्गदर्शक होते. त्यांनी आयुष्यभर तत्वनिष्ठ व पुरोगामी विचार जोपासला. नियोजन मंडळाचे अध्यक्ष, संरक्षणमंत्री ,परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री अशी विविध महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. अर्थमंत्री म्हणून देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. संसदेतील जेष्ठ अभ्यासू व आदर्शवत व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना सर्व दादा म्हणून सन्मान द्यायचे. विविध भाषांवर असलेले प्रभुत्व विविध विषयांचे सखोल ज्ञान यामुळे देशपातळीवर त्यांचे नेतृत्व लोकप्रिय ठरले.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन त्यांना पाठिंबा दिला, अशा शब्दात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुखर्जी यांना श्रध्दांजली वाहिली.

अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशाने एक थोर मुत्सद्दी गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित होते. देशाची अर्थ निती व परराष्ट्र धोरणात त्यांनी महत्वाचे योगदान दिले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली. त्यांच्या रुपात भारताचे एक अनुभवी मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्याशी चव्हाण कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध होते. ते आणि डॉ. शंकरराव चव्हाण केंद्रीय मंत्रिमंडळात सहकारी होते. संघटनात्मक आणि शासकीय कामांच्या निमित्ताने मलाही अनेकदा प्रणव मुखर्जी यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळाली.

छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा मंत्री

देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील पितामह आणि व्रतस्थ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा या क्षेत्रात उच्चविद्याविभूषित असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी पाच दशकांहून अधिक काळ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात संवेदनशीलपणे काम करत आपल्या कामाचा अमिट ठसा उमटविला. देशाच्या राष्ट्रपती पदावर काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या निधनाने देशातील एक ‘विद्वान राजनेता’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या प्रवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो..असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे

संभाजीराजे छत्रपती

देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अत्यंत दुःख वाटत आहे. खासदार म्हणून माझी नियुक्ती राष्ट्रपती कोट्यातून झाली, त्यावेळी प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्यासोबत भेटून चर्चा करण्याची संधी मिळाली. छत्रपती घरण्याविषयी त्यांच्या मनात अपूर्व आस्था होती, हे मला प्रत्येक वेळी जाणवायचं. त्यांनी माझ्या सामाजिक कार्याविषयी, विशेतः किल्ल्यांविषयी सुरू असलेल्या कामांचे नेहमीच कौतुक केले. अनेक बाबतीत मला त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले.आज आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला असल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र भाजपा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देशाने एक विद्वान नेता, कुशल प्रशासक आणि अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रणव मुखर्जी २०१२ ते २०१७ या कालावधीत देशाचे राष्ट्रपती होते. त्यापूर्वी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, व्यापारमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी कुशलतेने पार पाडल्या. त्यांची पाचवेळा राज्यसभेवर आणि दोनवेळा लोकसभेवर निवड झाली होती. संसदीय कार्याचा त्यांना व्यापक अनुभव होता. त्यांच्या निधनाने देशाची हानी झाली आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा-राजकारणातील अनेक गुपीतं काळाआड; प्रणव मुखर्जींच्या जीवनप्रवासावर एक दृष्टीक्षेप

हेही वाचा-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींं यांची अशी होती राजकीय कारकिर्द

Last Updated : Aug 31, 2020, 10:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details