अयोध्या - राम मंदिराचे भूमीपूजन नियोजित तारखेनुसार 2 जुलैला होणार होते. मात्र, भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने एक पत्रक जारी करून याची माहिती दिली आहे.
'देशाची सुरक्षा सर्वोच्च आहे. त्यामुळे नुकत्याच निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भूमीपूजन पुढे ढकलण्यात आले आहे', असे राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले. सर्व बाजूंनी विचार करून नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी अयोध्येची नियोजित भेट रद्द केली. भूमीपूजनाच्या कार्यक्रमाची पाहणी करण्याकरीता मुख्यमंत्री गुरुवारी अयोध्येला जाणार आहेत, असे ट्विट त्यांच्या कार्यालयाने केले होते. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टने लडाखमधील गलवान व्हॅलीत चीनी सैनिकांबरोबर झालेल्या हाणामारीतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच सर्वांनी घरून जवानांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले.
मंदिर प्रशासनाने एक वेबसाईटचेही उद्धाटन केले आहे. https://srjbtkshetra.org/ असे या वेबसाईटचे नाव आहे. मंदिराच्या बांधकामासंबंधी आणि इतर गोष्टींची माहिती या संकेतस्थळावरून देण्यात येणार आहे.