नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यामध्ये केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली. जर तुमच्याकडून दंगली नियंत्रणात येत नसतील तर तुम्ही सत्ता सोडायला हवी, अशी गंभीर टीका रजनीकांत यांनी केली आहे. यासोबत रजनीकांत यांनी दिल्लीकर नागरिकांनाही संयमाचे आवाहन केले आहे.
दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन झालेल्या हिंसाचारावर रजनीकांत म्हणाले, 'दिल्ली हिंसाचार हा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गुप्तचर विभागाचे अपयश आहे. एखाद्या गोष्टीचा निषेध हा शांततेतही करता येतो. त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही आणि तरीही हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे मोडून काढला पाहिजे. जर तुमच्याकडून दंगली नियंत्रणात येत नसतील तर तुम्ही सत्ता सोडायला हवी.'
हे बोलताना मात्र, रजनीकांत यांनी कोणाचेही प्रत्यक्ष नाव घेतले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याविषयी रजनीकांत म्हणाले, 'जेव्हा ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा केंद्राने सावधानता बाळगण्याची गरज होती. गुप्तचर विभागाने आपले काम नीट केले नाही. यामुळे हिंसा भडकली.'