जयपूर - राजस्थानमध्ये राजकीय गदारोळ सुरूच आहे. काँग्रेसच्या एका आमदाराने सचिन पायलट यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनीच त्यांना धोका दिल्याचे म्हटलं आहे. पायलट यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच पायलट यांना धक्का दिला. यासर्व खेळीमागे भाजपचा हात आहे, असे काँग्रेस आमदार प्रशांत बैरवा म्हणाले.
कोणीतरी दुसरेच राजकारण करत आहे. कारण, पायलट यांच्यावर विश्वास ठेवणारा गट खूप मोठा होता. मात्र, त्यांना त्याची कल्पना नव्हती. ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, त्याच लोकांनी त्यांना धक्का दिला. सचिन पायलट यांनी आमचे मत जाणून घेतले असते, तर चांगले झाले असते. त्यांच्याकडे 19 नाही तर 45 आमदार असू शकले असते. पण त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही, असे प्रशांत बैरवा म्हणाले.
आम्ही पायलट यांचेही हितचिंतक आहेत. याचा अर्थ असा नाही की, आम्ही काँग्रेसला मतदान करणार नाही. आम्ही काँग्रेसला शंभर टक्के मतदान करू. आमदारांच्या घोडेबाजारामध्ये भाजपाचा हात आहे. जर भाजपचा हात नसता, तर पायलट यांच्या गोटातील आमदार गुरगावमधील हरियाणा पोलिसांच्या संरक्षणाखाली नसते. काँग्रेसचे बंडखोर आमदारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांना रोखले जात आहे, असे प्रशांत बैरवा यांनी सांगितले.
दरम्यान, पायलट यांच्या गोटामध्ये एकूण 19 आमदार आहेत. सद्यस्थितीनुसार सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पुरेसे संख्याबळ पायलट यांच्या गटाकडे नाही, तर ‘राजकारणाचे जादूगार’ म्हणून परिचित अशोक गहलोत यांचे आमदार जैसलमेरमधील हॉटेलमध्ये आहेत. ज्यात प्रशांत बैरवाचाही समावेश आहे.