नवी दिल्ली -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाचे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कसे रोखता येईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, राजस्थानमधील एका अभियंत्याने कोरोना तपासण्याचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. अवघ्या 5 मिनिटांत हे सॉफ्टवेअर 1 हजार कोरोना नमुने तपासू शकते, असा दावा अभियंत्याने केला आहे.
डेहराडून टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलेल्या दिव्यांश बन्सल या अभियंत्याने हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर संभाव्य कोरोना रुग्णांचा एक्स-रे स्कॅन करून पाच सेकंदात कोरोना तपासू शकते, असा दावा दिव्यांश यांनी केला आहे.
अजमेर जिल्ह्यातील तेजा चौकातील रहिवासी बन्सल यांनी आपल्या दोन मित्रांसह सॉफ्टवेअर तयार केले आहे. जे अवघ्या पाच मिनिटांत सुमारे 1 हजार जणांची चाचणी करु शकते. सॉफ्टवेअरमुळे केवळ चाचणी खर्च कमी होणार नाही. तर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची जोखीमही कमी होईल, असे दिव्यांश म्हणाले.
बन्सल म्हणतात की सॉफ्टवेअरमुळे केवळ चाचणी खर्च कमी होणार नाहीत तर हेल्थकेअर व्यावसायिकांच्या संपर्कातील जोखीम कमी होईल. हे सॉफ्टवेअर केवळ कोरोना विषाणूच नाही तर न्यूमोनिया देखील शोधण्यास सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे.