रायपूर- कटघोरा सध्या छत्तीसगढमधील कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. कटघोरामध्ये आतापर्यंत कोरोनाचे तब्बल २४ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या संकटाने कटघोरामधील एका कुटुंबाला घेरले आहे. या कुटुंबातील एकापाठोपाठ ५ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. ज्यात दोन महिलांचाही समावेश असून या महिलांना लहान मुलीदेखील आहेत.
अशात या माता इच्छा असूनही आपल्या मुलांना हात लावू शकत नाहीत. शिवाय घरातील इतर सदस्यही बाधित असल्याने या लहानग्यांचा सांभाळ करणेही अवघड आहे. अशात या कुटुंबाच्या मदतीसाठी एम्स रुग्णालय पुढे सरसावले आहे. या रुग्णालयातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात परिचारिका या बाळांना दूध पाजत आहेत. हा फोटो पाहून कोणीही भावनिक होऊन जाईल.
मुलींचा कोरोना अहवाल निगेटीव्ह -
या दोन्हीतील एक मुलगी २२ महिन्यांची तर एक ३ महिन्यांची आहे. जेव्हा महिलेला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा ती आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन आली होती. यावेळी आरोग्य विभागाने या दोन्ही मुलींचीही कोरोना टेस्ट केली. या दोघींचाही अहवाल कोरोना निगेटीव्ह आला आहे.