नवी दिल्ली -नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी भागातील रेल्वे सेवा वगळून लांब पल्ल्याच्या इतर सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांच्या भाड्यामध्ये १ जानेवारी २०२० पासून वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी यासंबधी रेल्वे मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे.
शहरी रेल्वे सेवा वगळता इतर रेल्वे सेवा, सामान्य, नॉन एसी गाड्यांची भाडेवाढ प्रति कि.मी १ पैसे अशी करण्यात आली आहे.
हेही वाचा -२०१९ मधील या घटनांनी देशाला हादरवले, टाकूया शेवटची नजर..
तर मेल, एक्सप्रेस नॉन एसी गाड्यांची भाडेवाढ २ पैसे प्रति कि. मी करण्यात आली आहे. तर वातानुकूलित वर्गासाठी ४ पैसे प्रति कि. मी भाडेवाढ करण्यात आली आहे.
शताब्दी, दुरांन्तो, राजधानी एक्सप्रेस सारख्या प्रीमीयम रेल्वे गाड्यांच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीनुसार दिल्ली कोलकाता राजधानी एक्सप्रेसचे भाडे ५८ रुपयांनी वाढणार आहे. ही एक्सप्रेस २ हजार ४४८ किलोमीटर अंतर धावते.
हेही वाचा -'सीएएला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं; नाहीतर अरबी समुद्रात जलसमाधी घ्या'
तिकीट आरक्षणाच्या शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. आधीच तिकीट आरक्षित ज्यांनी केले आहे, त्यांना ही भाडेवाढ लागू होणार नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.