पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू आहे. सर्व पक्ष प्रचारामध्ये व्यग्र आहेत. आज (शुक्रवारी) काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधीही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. बिहारच्या नवादा येथील हिनसुआ येथे आपल्या पहिल्या प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी आणि नितिश कुमार यांच्यावर टीका केली. चीनने भारताची 1200 किलोमीटर जमीन घेतली. गलवाण खोऱ्यातील संघर्षात 20 सैनिक हुतात्मा झाले. मात्र, भारतीय हद्दीत कोणी आले नाही, असे सागून मोदींनी जवानांचा अपमान केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
मोदींची दुटप्पी भूमिका
जवान शहीद झाले तेव्हा मोदी काय करत होते? चीनने कब्जा केलेल्या भारताच्या जमिनीवरून चिनी सैनिकांना बाहेर कधी काढणार? गेल्या निवडणुकीवेळी मोदींनी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तरुणांना रोजगार दिले नाही, असे सांगतानाच, पंतप्रधान मोदी यांची दुटप्पी भूमिका असते. तुमच्यासमोर ते डोके टेकवतील आणि घरी गेल्यावर अंबानी आणि अदानी यांचे काम करतील. तसेच नोटाबंदीचे पैसे श्रीमंतांच्या खिशात घातले, असे राहुल गांधी म्हणाले.