महाराष्ट्र

maharashtra

केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अ‌ॅपचा नागरिकांच्या खासगी आयुष्याला धोका'

By

Published : May 3, 2020, 8:41 AM IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोग्य सेतू अॅपवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या अॅपमुळे लोकांची खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता राहुल गांधींनी वर्तवली आहे.

Rahul Gandhi raises security, privacy concerns over ArogyaSetu app
Rahul Gandhi raises security, privacy concerns over ArogyaSetu app

नवी दिल्ली - कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे मोबाईल आधारित अ‌ॅप विकसित केले आहे. सध्या केंद्र सरकार सगळ्यांना आरोग्य सेतू अ‌ॅप वापरण्याचे आवाहन करत आहे. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोग्य सेतू अॅपवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या अॅपमुळे लोकांची खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता राहुल गांधींनी वर्तवली आहे.

आरोग्य सेतू अॅपवर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 'आरोग्य सेतू हे अॅप लोकांच्या आयुष्यावर देखरेख करणारी एक प्रणाली आहे. ते एका खासगी ऑपरेटरकडून आउटसोर्स केले जात असून त्यावर सरकारी संस्थेचं नियत्रंण नाही. लोकांचे खासगी आयुष्य, डेटा आणि गोपीनियतेच्या सुरक्षेसंदर्भात हे अॅप प्रश्न उपस्थित करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्याला सुरक्षित ठेवण्यात मदत करत आहे. मात्र, नागरिकांच्या सहमतीशिवाय कोरोना संकटाचा फायदा उचलत त्यांच्यावर निगरानी ठेवणं चुकीचं आहे', असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.

आरोग्य सेतू हे अ‌ॅप सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रसार असलेला भाग म्हणजे कंन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हे अ‌ॅप वापरावे, असे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.

आरोग्य सेतू अ‌ॅप तुम्हाला कोरोनाचा धोका किती आहे, हे सांगते. तसेच तुमच्या परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण किंवा संभाव्य रुग्ण किती आहेत. याची माहिती देते. मोबाईलच्या ब्ल्यूटुथद्वारे हे अ‌ॅप काम करते. देशामध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ४ मे पासून पुन्हा २ आठवड्यांसाठी संचारबंदी वाढविण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details