नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त भावनिक ट्विट केले आहे. 'माझ्या वडिलांनी मला सर्वांवर प्रेम आणि आदर करण्यास शिकवले. ते खूप चांगले, प्रेमळ आणि मायाळू, दयाळू होते. त्यांनी मला द्वेष करायला कधीच शिकवले नाही. क्षमा करायला शिकवले. मला त्याची आठवण येते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांची कृतज्ञतेने आठवण काढतो,' असे ट्विट राहुल यांनी केले आहे.
काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही 'माझे वडील माझ्यासाठी हिरो आहेत,' असे म्हणत दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्मृतिदिनानिमित्त राजीव गांधींना आदरांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी राजीव गांधींवर टोकाची टीका केली होती. 'ते भ्रष्टाचारी होते आणि तीच ओळख घेऊन त्यांचे जीवन समाप्त झाले,' असे त्यांनी म्हटले होते.तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राजीव गांधींना आदरांजली वाहिली आहे. राजीव यांची मनापासून आठवण काढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनीही राजीव गांधींना आदरांजली वाहिली आहे. २१ व्या शतकातील भारताचे स्वप्न पाहणारा एक महान नेता देशाला मिळाला, असे त्यांनी म्हटले आहे.१९९१ मध्ये राजीव गांधींची आत्मघातकी स्फोटामध्ये हत्या घडवून आणली होती. श्रीपेरुंबुदुर येथे लिट्टे या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला होता. राजीव गांधी १९८४ ते १९८९ या काळात भारताच्या पंतप्रधान पदी होते.