नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी आणि शाह भारताची विभागणी करुन पसरलेल्या द्वेषाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
'तरुणांनो, मोदी-शाह यांनी तुमचे भविष्य उद्धवस्त केले.. भारताची विभागणी करुन द्वेषामागे लपण्याचा प्रयत्न' - राहुल गांधी
काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
भारतातील तरुणांनो मोदी आणि शहा यांनी तुमचे भविष्य उद्धवस्त केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान आणि रोजगाराच्या अभावामुळे देशातील तरुणांमध्ये राग आहे. तुमच्या रागाचा त्यांना सामना करता येणार नाही. म्हणून भारताची विभागणी करुन पसरलेल्या द्वेषाच्या मागे ते लपत आहेत. मात्र, आपण प्रत्येक भारतीयांबद्दल प्रेम दाखवून त्यांना पराभूत करू शकतो, असे राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. काँग्रेस पक्षाकडून सोमवारी दिल्लीतील राजघाटावर प्रदर्शन करण्यात येणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत आंदोलन चिघळले आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधील काही भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. आंदोलनांमध्ये आतापर्यंत उत्तर प्रदेशमधील १५ जणांचा, तर कर्नाटकमधील दोघांचा जीव गेला आहे.