नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्याच्या 'पीर की गली' येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी मिनी बस दरीत कोसळून ११ जणांचा गुरवारी मृत्यू झाला आहे. या घटनेवर राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
जम्मू-काश्मीरमधील भीषण अपघातात नऊ मुलींसह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ऐकून मला दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ठार झालेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल मला सहानभूती असल्याचे त्यांनी टि्वट केले आहे.
शोपियान जिल्ह्यामधील, पुंछ येथील एका कॉम्प्युटर कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना घेऊन मिनी बस शोपियाँ मार्गावरील मुघल रोडने जात होती. दरम्यान, एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ‘पिर की गली’ भागात ही बस दरीत कोसळली. यामध्ये एकूण ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत. मृतामध्ये ९ मुलींचा समावेश आहे. जखमींवर शोपियाँतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.