नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही संपूर्ण ताकदीने सरकार आणि सैनिकांसोबत उभे आहोत, असे मत गांधी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. गुरुवारी हल्ल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पत्रकार परिषद रद्द केली होती.
दहशतवाद्यांचे हेतू कितीही मोठे असले, तरी ते आपल्या देशाला धक्काही लावू शकत नाहीत.तसेच आपल्या देशाला विभागण्यासाठी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. त्यांना आपण ठामपणे सांगितले पाहिजे, की या देशाला कोणतीच शक्ती विभागू शकत नाही, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.
दहशतवाद्यांना साडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही आणि संपूर्ण विरोधी पक्ष सैनिकांच्या आणि सरकारच्याही पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले. आमचा देश प्रेमाच्या आधारावर टिकलेला आहे. कोणत्याही हिंसाचाराने देशाच्या सार्वभौमत्वाला धोका येणार नाही, हे दहशतवाद्यांनी लक्षात ठेवावे, असेही राहुल यावेळी म्हणाले.
त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदवला. दहशतवादी शक्तींसोबत कोणत्याही परिस्थितीत आपण हात मिळवणी करणार नाहीत. त्यांच्या विरोधात आपण संपूर्ण शक्तीनिशी लढायला हवे, असे मत सिंग म्हणाले.
गुरुवारी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये मृतांचा आकडा वाढला असून तो ४५ पर्यंत पोहोचला आहे. जैश-ए-मोहंम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबादारी घेतली होती. देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून या हल्ल्याकडे पाहिले जात आहे. संपूर्ण जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे.