नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची सर्व जबाबदारी घेताना शनिवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. यानंतर राहुल गांधी म्हणाले, मला पक्षाच्या विचारधारेसाठी काम करायचे आहे, कोणत्या पदासाठी नाही. महात्मा गांधींनी जात-धर्म सोडून सर्वांसाठी एक विचारधारा तयार केली. परंतु, हे सर्व करत असताना त्यांनी कोणतेही पद स्वीकारले नाही.
मला पक्षाच्या विचारधारेसाठी काम करायचं आहे, कोणत्या पदासाठी नाही - राहुल गांधी
महात्मा गांधींनी जात-धर्म सोडून सर्वांसाठी एक विचारधारा तयार केली. परंतु, हे सर्व करत असताना त्यांनी कोणतेही पद स्वीकारले नाही. त्यामुळे मला पक्षाच्या विचारधारेसाठी काम करायचे आहे, कोणत्या पदासाठी नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधीनी यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका केली. राहुल म्हणाले, वरिष्ठांनी त्यांच्या मुलांना तिकिट देण्यासाठी दबाव आणला. परंतु, त्यांनी राफेल मुद्यावर हवा तेवढा जोर दाखवला नाही. याउलट ते फक्त आपआपल्या मतदारसंघात प्रचार करत होते. बैठकीत प्रियंका गांधीनीही राहुलच्या वक्तव्यावर सहमती दर्शवताना म्हटले, की भाजपवर टीका करताना राहुल एकटे पडले होते. वरिष्ठांकडून त्यांना हवी तशी साथ मिळाली नाही.
बैठकीत राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, पक्षाच्या सदस्यांकडून तो नामंजूर करण्यात आला. यावेळी पक्षाच्या सदस्यांनी सल्ला देताना सांगितले, की पक्षाच्या संरचनेत प्रत्येक स्तरावर पूर्णपणे बदल करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.